मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे तीनही पक्षाच्या नेत्यांनी कितीही सारवासारव केली तरी महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

स्वबळाची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्यावर पाळत ठेवत आहेत, असा आरोप करून हे कुठेतरी आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार, असे खळबळजनक विधान नाना पटोले यांनी केले. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद उद्धव ठाकरे, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे (दिलीप वळसे-पाटील) आहे, असे सांगताना नाना पटोले यांनी मला सुखाने जगू देणार नाहीत, असेही म्हटले आहे. दुष्मनाला मारायचे असेल तर घरात घुसून मारावा लागतो. आपण ही पावले उचलल्यास दुष्मन पहिले आपले घर वाचवेल, तुमच्या घरावर लक्ष ठेवणार नाही, असेही पटोले यांनी म्हटले आहे.