देशभर महागाईविरोधात काँग्रेसची निदर्शने

0
9

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : महागाई, जीएसटी आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसतर्फे शुक्रवारी रस्त्यापासून संसदेपर्यंत निदर्शने सुरू आहेत. दिल्ली, पाटणा, मुंबई, भोपाळसह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात निदर्शने केली.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अकबर रोडवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी तीन स्तरांमध्ये बंदोबस्त लावला आहे. कोणत्याही कार्यकर्त्याला आत प्रवेश दिला गेला नाही. सोनिया, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्व खासदार काळे कपडे घालून सभागृहात आले आणि त्यांनी केंद्राच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

सकाळी पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, ‘तुम्ही हुकूमशाही करत आहात का, इथे रोज लोकशाहीची हत्या होत आहे. या सरकारने ८ वर्षांत लोकशाही उद्ध्वस्त केली. काँग्रेसकडून आज देशभरात केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी हातावर काळी पट्टी बांधली होती.

या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर जंतरमंतर परिसर वगळता संपूर्ण दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, सरकार आम्हाला महागाईविरोधात आंदोलन करण्यापासून रोखू इच्छिते. त्यामुळे ते काँग्रेस नेत्यांना सतत त्रास देत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, देशात काय परिस्थिती आहे. देशातील जनतेला लोकशाहीचा अंत पाहावा लागेल, असे कुणालाही वाटले नसेल. देशात ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयची दहशत आहे.