नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर (वय ५५) यांचे कोरोनामुळे शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार उपचार सुरू असतानाच  त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्‌विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना नांदेडमधील रुग्णालयात दाखल केले होते. परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने मुंबईत हलवण्यात आले होते.   

माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. आ. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना, अशा शोकभावना मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.