भोपाळ  (वृत्तसंस्था)  : मध्य प्रदेशात  नऊ महिन्यांपूर्वी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या  एका नेत्याला काँग्रेसने पक्षाच्या  महासचिवपदी नियुक्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात  आश्चर्य व्यक्त केले जात  आहे. याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर संबंधित नेत्याची नियुक्ती रद्द करण्याची नामुष्की काँग्रेसवर आली.  

युवक काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक नुकतीच पार पडली. यात हर्षित सिंघई यांची १२ मताने महासचिवपदी निवड  झाली. पण हा संपूर्ण प्रकार अतिशय हास्यास्पद असून या निवडणुकीत मला कोणालाही रस नव्हता. युवक काँग्रेसने माझी महासचिव म्हणून निवड केली असली, तरी  मी मार्च महिन्यांत ज्योतिरादित्य सिंधिया  यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेसमध्ये असताना मी तीन वर्षांपूर्वी महासचिव पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण लोकसभा निवडणुकीमुळे ही निवडणूक रद्द झाली होती. मी  काँग्रेस सोडताना माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची विनंती पक्षाला केली होती. पण काँग्रेसने  रेकॉर्डमध्ये बदल केला नाही.  त्यामुळेच काँग्रेसने पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांची विविध पदांवर नियुक्त्या केल्याचे  सिंघई यांनी सांगितले.