सातारा  (प्रतिनिधी) : काँग्रेस  पक्षाचे ज्येष्ठ नेते  व माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने आज (सोमवार) पहाटे निधन झाले.  त्यांच्या पार्थिवावर आज कऱ्हाड तालुक्‍यातील उंडाळे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .  त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला जात आहे.  

विलासकाका उंडाळकर यांनी १९६२ मध्ये जिल्हा बँकेतून राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर ते कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी सलग पस्तीस वर्षे या मतदारसंघांचे प्रतिनिधीत्व केले.  १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्यात कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला ठेवण्यात विलास काकांना यश आले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यापासून काहीकाळ ते राजकारणापासून दूर होते.