इचलकरंजी (प्रतिनिधी) : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. मलाबादे चौकात रॅली आल्यानंतर मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर शहरातील प्रमुख मार्गवरून रॅली काढून प्रांत कार्यालयावर धडकली. यावेळी शिष्टमंडळाने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, डिसेंबर २०२० पासून सातत्याने पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव वाढत आहेत. पेट्रोलने शंभरी पार केली आहे. गॅसचे दर ८२२ रू पर्यंत पोहोचले आहेत. तर डिझेल ८७ रू प्रति लिटर झालेले आहे. त्यामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. परिणामी डाळी, भाजीपाला व फळ फळावळ, खाद्यतेल आदी वस्तूं महागाई झालेल्या आहेत. केंद्र सरकारने स्वत:चे उत्पन्न स्त्रोत वाढविण्यासाठी भरमसाठ कर या इंधनावर लावलेला आहे. तो कर कमी केला तर निश्चितच दर वाढ कमी होऊ शकते. केंद्र सरकारने आपल्या धोरणात बदल करून पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वस्तू व सेवा कर अंतर्गत आणावेत. घरगुती गॅसच्या सबसिडी पूर्वीप्रमाणे चालू करावी. इंधनावरील अबकारी कर कमी करावेत.

या रॅलीमध्ये नगरसेवक शशांक बावचकर, काँग्रेस शहराध्यक्ष व नगरसेवक संजय कांबळे, नगरसेवक राहुल खंजिरे, प्रविण लोले, बाबासाहेब कोतवाल, अजित मिणेकर  युवराज शिंगाडे, शशिकांत देसाई आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग  घेतला.