कोल्हापूर (प्रतिनिधी) : नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी गट ‘ब’ आणि गट ‘क’ परीक्षेतील निकालामध्ये कोल्हापुरातील विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. याबद्दल विद्या प्रबोधिनीतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  

नीलेश लक्ष्मण सावंत हा सहायक कक्षा अधिकारी परीक्षेत राज्यात प्रथम, तर अक्षता बाबासाहेब नाळे ही विद्यार्थिनी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. याशिवाय शुभांगी सुभाष पाटील व अजय अनिल तोडकर या दोघांनीही राज्य कर निरीक्षक परीक्षेत यश संपादन केले.

शनिवारी विद्या प्रबोधिनी येथे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यशवंतांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. दडपण विरहित अभ्यास, झालेल्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विवेचन, भरपूर सराव व या सर्वांमधील सातत्य हेच आपल्या यशामागील कारण असल्याचे मत सर्वच यशवंतांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

यशवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत असतानाच शासकीय नोकरीची संधी देणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी जरूर द्याव्या; मात्र दीर्घकाळ पूर्णवेळ अभ्यास करत राहण्याऐवजी सुरुवातीचे एखादे वर्ष पूर्णवेळ अभ्यास व तदनंतर स्वतःचा व्यवसाय अथवा खासगी नोकरी करत अर्धवेळ अभ्यासाचा पर्याय निवडता येईल का, याचा स्पर्धा परीक्षार्थींनी विचार करायला हवा, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.