गडहिंग्लजची काळभैरी यात्रेबाबत भाविक-मानकऱ्यांच्यात संभ्रमावस्था…

0
791

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : दरवर्षी गडहिंग्लजची काळभैरी यात्रा मोठ्या उत्साहात आणि प्रचंड गर्दीत पार पडते. यावर्षी ही यात्रा १ मार्च रोजी आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमानुसार मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्यात येत आहेत. त्यामुळे ही यात्रा होणार की नाही याबाबत भाविक आणि मानकऱ्यांच्यात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. याबाबत आज (मंगळवार) प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदन देण्यात आले.

यात्रेच्या आदल्या दिवशी गडहिंग्लज शहरातून मोठ्या उत्साहात पालखी मिरवणूक काढण्यात येते. शहरवासीयांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. एसटी महामंडळ, प्रशासन, नगरपालिका यांचे दरवर्षी नेटके नियोजन असते. पण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासना कडून अनेक नियम व अटी घालून मोजक्याच लोकांच्या उपस्थित धार्मिक विधी करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने सर्व मानकरी,भाविक, एसटी महामंडळाचे अधिकारी, नगरपालिका यांची संयुक्त बैठक घेऊन याबाबतची संभ्रमावस्था दूर करावी. असे निवेदन सर्व मानकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले.

या निवेदनावर विश्वास खोत, विठ्ठल गुरव,अशोक कांबळे,रावसाहेब डोमने,सुरेश डोमने, सुरेश हेब्बाळे, विलास होडगे, विशाल डोमने आदींच्या सह्या आहेत.