कंडोमचा वापर वाढला..!

0
299

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कंडोमचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. मागील पाच वर्षांपासून लग्न झालेली जोडपी कुटुंब नियोजनासाठी मोठ्या प्रमाणात कंडोमचा वापर करत आहेत, अशी माहिती राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून समोर आली आहे.

पुरुषांकडून मोठ्या प्रमाणात कंडोम वापरण्यात येत असल्याने महिलांमध्ये नसबंदी आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर कमी झाला आहे. पुरुषांच्या कौटुंबिक नियोजनामुळे हा बदल होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. २२ राज्यांतील शहरी आणि ग्रामीण भागातही हा बदल होत असल्याची माहिती भारतीय लोकसंख्या परिषदेच्या डॉ. राजीब आचार्य यांनी दिली.

गेल्या पाच वर्षांत लोकसंख्या नियंत्रणाची जबाबदारी ही पुरुषांनीच उचलल्याचे चित्र समोर आले आहे. काही महिला अजूनही गर्भनिरोधक गोळ्या किंवा नसबंदीसारखे उपाय योजत असल्याचंही पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पुरुष कंडोम वापरण्यास प्राधान्य देत असल्यानं लोकसंख्येत हा बदल होत असल्याचंही भारतीय कुटुंब नियोजन संघटनेच्या डॉ. मनीषा भिसे यांचे म्हणणे आहे.

मुंबईतही १० पैकी ७ लग्न झालेली जोडपी कौटुंबिक नियोजन करत आहेत. त्याचे प्रमाण २०१५-१६ मध्ये ५९.६ टक्के होते.  २०१९-२० मध्ये तेच प्रमाण ७४.३ टक्क्यांपर्यंत वाढले. तसेच कंडोमचा वापरही ११.७ टक्क्यांवरून १८.१ टक्क्यांपर्यंत वाढला. महिलांमध्ये नसबंदी करून घेण्याचं प्रमाणही ४७ टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत खाली आलं. तसेच गर्भनिरोधक गोळ्या वापरण्याचं प्रमाणही ३.१ टक्क्यांवरून १.९ टक्क्यांवर आलंय. शहरी भागात महिला गर्भनिरोधक गोळ्यांच्या दुष्परिणामांनी चिंतीत असतात, त्यामुळेच त्यांनी त्याचा वापर कमी केल्याचं स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. किरेन सेल्हो यांनी सांगितले.

मुंबईत पुरुषांकडून कंडोम वापरण्याचे प्रमाणही ८.९ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. दर १० पुरुषांमागे दोन पुरुष कंडोम वापरत असल्याचं उघड झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात फार मोठे बदल झालेले नाहीत. फक्त कंडोमच्या वापरात ७.१ टक्क्यांवरून १० टक्के वाढ झाली. तसेच नसबंदी आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापराचं प्रमाण अनुक्रमे ५०.७ टक्क्यांवरून ४९.१ टक्के आणि २.४ टक्क्यांवरून १.८ टक्क्यांवर आले आहे.