कळे (प्रतिनिधी) : कळे छ. संभाजी चौकात अखेर नो पार्किंगबाबत ठोस उपाययोजना सुरू झाल्या आहेत. याठिकाणी नो पार्किंगचे फलक लावून इतर आवश्यक त्या उपाययोजना करण्यास कळे पोलिस, ग्रामपंचायतीने सुरूवात केली आहे. गेल्या तीस वर्षांपासून बंद असलेला रस्ता खुला करणे आणि ट्रॅफिक हटविण्याबाबत ग्रामस्थांमधून मागणी होत होती.

कळे येथील कल्लेश्वर गल्लीतील संभाजी चौकात स्थानिक रहिवासी आणि इतर लोक अस्ताव्यस्त वाहनांचे पार्किंग करीत होते. त्यामुळे रहदारीला  अडथळा होत होता. याबाबत संबंधितांना लेखी नोटीस दिल्यानंतर हे बेकायदेशीर पार्किंग तात्पुरते थांबत असे. काही कालांतराने याठिकाणी तेच लोक पुन्हा बेकायदेशीर पार्किंग करीत होते. त्यामुळे सदर वाहने आणि त्यांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करावी म्हणून ग्रामपंचायतीने कळे पोलिस ठाण्याला लेखी कळविले होते.

तत्कालीन सपोनि. श्रीकांत इंगवले यांनी जून २०२० मध्ये कारवाई करून बंद रस्ता रहदारीसाठी खुला केला होता. तसेच विद्यमान सपोनि. प्रमोद सुर्वे यांनीही जून २०२१ मध्ये कारवाई केली.  पण पुन्हा हेतुपुरस्सर वाहने पार्किंग करणे सुरू झाले होते. त्यामुळे ठोस कारवाईसाठी ग्रामस्थांनी  तक्रार अर्ज दिला होता.  यावेळी ग्रामपंचायतीने नो पार्किंग फलक लावला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पट्टे मारले आहेत. तसेच कळे पोलिसांनी बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. याबाबत स्थानिक रहिवासी, ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.