चिंता वाढली : भारतात नव्या कोरोनाचा प्रवेश      

0
294

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात कोरोनाचा  संसर्ग नियंत्रणात आला असतानाच  १६ देशात पोहोचलेल्या नव्या कोरोनाने प्रवेश केला आहे. देशात कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले ६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. या विषाणूला रोखण्यासाठी भारताने ब्रिटनमधून येणारी विमान थांबवली आहे. मात्र, तरीही नव्या कोरोनाने चोर पावलांनी प्रवेश केला आहे.

२५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून आलेल्या ३३ हजार प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ११४ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. कोलकाता, भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीसीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बंगळुरू, एनआयएमएचएएनएस बंगळुरू, आयजीआयबी दिल्ली आणि एनसीडीसी दिल्ली या प्रयोगशाळांमध्ये त्यांचे नमुने पाठवले होते.

बंगळुरू येथील प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत  तीन रुग्णांमध्ये नवीन स्ट्रेन  आढळला आहे. तर हैदराबाद प्रयोगशाळेतील दोघांच्या शरीरात आणि पुण्यातील एका रूग्णामध्ये स्ट्रेन आढळला आहे. एकूण सहा रुग्णांच्या शरीरात कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. या सर्व रुग्णांना स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवले आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन केले आहे. इतर प्रवाशांची माहिती घेतली जात आहे.