नागपूर : देशात लोकसंख्येचे योग्य संतुलन आवश्यक आहे. आपल्या देशाचे पर्यावरण किती लोकांचे पालनपोषण करू शकते, किती लोकांना ते सांभाळू शकते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. लोकसंख्येचे सर्वसमावेशक धोरण असावे आणि ते सर्वांनाच लागू व्हावे. त्या धोरणातून कोणालाही सवलत देता कामा नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी केले. यावेळी महिला गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संघाच्या मुख्यालयात झाला. संघाच्या दसरा उत्सवात प्रथमच संतोष यादव ही महिला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती. दोनदा एव्हरेस्ट सर करणाऱ्या संतोष यादव या एकमेव महिला आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

एखाद्या देशात जेव्हा लोकसंख्येचा असमतोल निर्माण होतो, तेव्हा त्या देशाच्या भौगोलिक सीमाही बदलतात. एका भूभागातील लोकसंख्येचा समतोल बिघडल्यानेच इंडोनेशियापासून पूर्व तिमोर, सुदान ते दक्षिण सुदान आणि सर्बिया ते कोसोवा असे नवे देश निर्माण झाले. लोकसंख्या नियंत्रणाबरोबरच पंथावर आधारित लोकसंख्येचा समतोल राखणे हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. चीनने लोकसंख्या नियंत्रण धोरण बदलून लोकसंख्यावाढीचे धोरण स्वीकारले आहे. आपल्या देशातील लोकसंख्येचादेखील देशहिताच्या दृष्टीने विचार करता येणे शक्य आहे. असे मोहन भागवत म्हणाले.

ते म्हणाले, महिलांशिवाय विकास शक्य नाही. मातृशक्ती जे करू शकते ते पुरुषही करू शकत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे त्यांचे प्रबोधन, सक्षमीकरण करून त्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य देणे तसेच कामांमध्ये समान स्वरुपात सहभागी करणे आवश्यक आहे.

माझे वागणे-बोलणे पाहून अनेकदा लोक मला विचारायची की तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहात का? पण त्यावर मी विचारायची की, ते काय असते? मला त्यावेळी संघाबद्दल माहिती नव्हती; पण आता मी जगातील समस्त मानव जमातीला विनंती करते की, त्यांनी येथे यावे आणि संघाचे कार्य जाणून घ्यावे. हे अतिशय उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे, असे महिला गिर्यारोहक संतोष यादव यांनी सांगितले.