कुरुंदवाड येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्वंकष आराखडा

0
192

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शहरातील वाहतुकीची कोंडी आणि आणि पार्किंगच्या समस्येचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीने नागरी सुरक्षिततेसाठी वाहतुकीचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचा निर्णय पालिका, पोलीस प्रशासनाने विचारविनिमयासाठी घेतलेल्या बैठकीत झाला. दरम्यान, शहरात रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या भेळ, पाणी पुरी, भजी, चहा टपरी व हातगाड्यांसाठी मटन मार्केट पाण्याच्या टाकीजवळ खाऊ गल्ली चौपाटी निर्माण करण्याचे या बैठकीत ठरले.

पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शहराच्या वाहतूक आणि पार्किंग आराखड्यासंदर्भात पालिका व पोलीस प्रशासनाची आज (शुक्रवारी) बैठक झाली.  प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव, सपोनि बालाजी भांगे, उपनिरीक्षक अमित पाटील, किशोर खाडे आदी उपस्थित होते.

शहरातील मुख्य रस्त्यावरील अस्ताव्यस्त पार्किंग मुळे होणारा अडथळा कमी करण्याच्या दृष्टीने शिवतीर्थ ते जुने एसटी थांबा, रिक्षा स्टॉप ते महाराणा प्रताप चौक, सन्मित्र चौक ते थिएटर चौक ते नगरपालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते सरकारी दवाखाना ते पालिका चौक ते बारगीर मशिद. पालिका चौक ते ह. दौलतशहा दर्गा ते रिक्षा स्टॉप. पालिका चौक ते बाजार पेठ या परिसरात सम विषम तारखेला पार्किंग.

महाराणा प्रताप चौक ते लक्ष्मी बेकरी, मजरेवाडी रस्ता. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक परिसर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक परिसर नो पार्किंग परिसर म्हणून निश्चित करण्यात आले. तर झारी मशिद चारचाकी व दोनचाकी, दि फेडरल बँकेसमोर (ओंकार चौक) चारचाकी वाहने, अग्निशमन केंद्र चारचाकी व दोन चाकी वाहने पार्किंगसाठी ही ठिकाणे निश्चित करण्यात आली.

गुरुवारी भरणारा आठवडी बाजार महात्मा बसवेश्वर चौक ते वंदेमातरम चौक, ईगल चौक ते सन्मित्र चौक या परिसरामध्ये नवबाग रस्त्यावर बसण्यासाठी विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली. तर भालचंद्र थिएटरपासून ते सन्मित्र चौक रजपूत गिरण पर्यंतच बाजार भरविण्यात येणार आहे. यापुढे बाजार भरविण्यास व विक्रेत्यांना बसण्यास बंदी असेल.

दरम्यान या बैठकीत लोकप्रतिनिधी म्हणून माजी नगराध्यक्ष दीपक गायकवाड अक्षय आलासे,पत्रकार प्रतिनिधी म्हणून तुकाराम पवार, बाबासाहेब मोरे, सामाजिक कार्यकर्ते सूचीतोष कडाळे यांनी वाहतूक आराखड्याबाबत सूचना मांडल्या. याबाबतचा नगर रचनाकार नीतीश कदम, प्रदीप बोरगे यांनी कच्चा आराखडा बैठकीपुढे सादर केला.