कोल्हापूर (प्रतिनिधी) : सीपीआर रुग्णालयात कसबा बावड्यातील एका दोन वर्षाच्या बालकावर “अॅव्होटिक बलून व्हॉल्वोटॉमी ही बिनटाक्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे.

कसबा बावड्यातील दोन वर्षाच्या बालकाला दि. १० मार्च रोजी छातीत धडधडणे,  दम लागणे, थकवा येणे या कारणामुळे त्याच्या आईवडिलांनी उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र सदर रुग्णांला पुन्हा सीपीआरमध्ये दाखल केले. त्यानंतर हदयरोग तज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना यांनी या बालकाच्या आजाराचे निदान केले. त्याच्या हृदयामधून पूर्ण शरीराचा रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य शुध्द रक्तवाहिनीच्या तोंडा जवळील झडपा एकमेकांना चिकटलेल्या होत्या. त्यामुळे हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होता आणि त्याचा उलटा परिणाम हृदयावर ताण पडून हृदयाची पंपिंग क्षमता क्षीण झाली होती. त्यामुळे त्याच्या झडपेतील तीन पैकी दोन पाकळ्या खुल्या करण्यासाठी अॅटलास बलूनद्वारे बालकावर ‘अॅव्होटिक बलून व्हॉल्वोटॉमी’ ही बिनटाक्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. त्यामुळे बाळाच्या बंद असलेल्या झडपेच्या सर्व पाकळ्या खुल्या झाल्याने हदयावरील ताण (पूर्वी २००) सध्या १०० एवढ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे बाळाची प्रकृती सुधारत आहे. ही शस्त्रक्रिया बाळाला पूर्ण भूल न देता केवळ ऑक्सिजनच्या आधारावर यशस्वी करण्यात आली.

या शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय बरगे यांचे मार्गदर्शन तर डॉ. अक्षय बाफना, डॉ. वरुण देवकाते, भूलतज्ञ डॉ. निलेश जावे, देवेंद्र शिंदे, उदय बिरांजे, सौ. मंदाकिनी पाटील, सुनील जठार, समाजसेवा अधिक्षक शशिकांत राऊळ यांचे सहकार्य लाभले.