कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील वसगडे गावातील सुमारे ३५० हेक्टर शेती महापुराच्या पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. गावातील अनेक घरेही पाण्याखाली होती. त्यामुळे पूरबाधित क्षेत्राचे ५ दिवसाच्या आत पंचनामे पूर्ण करा, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (शनिवार) प्रशासनाला दिले. 

पालकमंत्री पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून गावातील पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. यावेळी गावातील जेवढी घरे पाण्याखाली जातात, त्यांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी प्रशासन तयार असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

यावेळी पंचायत समिती सदस्य शोभा राजमाने, सरपंच नेमगोंडा पाटील, पोलीस पाटील संजय पाटील, डॉ. सी. एस. पाटील, सुनील पाटील, डॉ. श्रीकांत चौगुले, भुजगोंड पाटील, रायगोंड पाटील, विजय पाटील, सचिन पाटील, सुदाम सोनवणे, रावसाहेब झोरे, बाळासाहेब उपाध्ये, धुळगोंडा पाटील, कृषी सहाय्यक स्मिता नवलगे, गटविकास अधिकारी जयवंत उगले आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.