संपूर्ण वीजबिल माफीशिवाय माघार नाही : समरजितसिंह घाटगे यांचा निर्धार

0
118

कागल (प्रतिनिधी) : शेती आणि घरगुती थकित वीज बिलापोटी कनेक्शन तोडण्यास स्थगिती दिली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र,  लॉकडाऊन काळातील संपूर्ण वीजबिले माफ होत नाहीत, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा निर्धार शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला आहे.

ते पुढे म्हणाले की, सरकारने प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. याबाबत आम्ही वारंवार आवाज उठवला असून चालू अधिवेशनात ठोस निर्णय घ्यावा. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत आम्ही २४ फेब्रुवारीरोजी  ऐतिहासिक दसरा चौकात उपोषणाला बसलो होतो. या लोकभावनेचा विचार करून अधिवेशनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हा विषय सविस्तरपणे मांडला. त्यामुळे वीज कनेक्शन न तोडण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. तरीही संपूर्ण वीजबिल माफ करून घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, असा निर्धार  त्यांनी व्यक्त केला.

शिवार संवाद कार्यक्रमामधून आम्ही शेतकऱ्यांना व ग्राहकांना थेट भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ करावीत व प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले ५० हजार रुपयांचे अनुदान त्वरीत द्यावे. या मागणीवर आम्ही ठाम आहोत. सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे. याबाबत चालू अधिवेशनात ठोस निर्णय घ्यावा, असे घाटगे यांनी म्हटले आहे.