पडखंबे प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई मंजूर : आ. प्रकाश आबिटकर

0
292

गारगोटी (प्रतिनिधी) :  भुदरगड तालुक्यातील पडखंबे येथे जलसंधारण महामंडळाकडून ल.पा.प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. परंतू प्रकल्पातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यशासनाकडून खासबाब म्हणून ७ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती आ. प्रकाश आबिटकर यांनी दिली.

पडखंबे ल.पा.तलाव हा गेल्या १० ते १५ वर्षापासून निधी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत होण्याच्या प्रश्नामुळे प्रलंबित होता. परिणामी हा प्रकल्प सन २०१३ साली रद्द करण्याची शिफारस जलसंधारण महामंडळाकडे करण्यात आली होती. परंतू आ. प्रकाश आबिटकर यांनी २०१४ साली पडखंबेसह परिसरातील महत्वपुर्ण असणाऱ्या हा प्रकल्प रद्द न करता सुधारीत प्रशासकीय मान्यता‍ मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला. तत्कालीन जलसंधारण राज्यमंत्री विजयजी शिवतारे यांच्याकडे वेळोवेळी घेतलेल्या बैठका आणि पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला १४ कोटी रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली.

परंतू प्रकल्पाचे काम सुरू करण्यामध्ये प्रमुख अडसर असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या बाधीत होणाऱ्या जमिनीकरीता मोबदला मिळणे गरजेचे असल्यामुळे याबाबत नुकसान भरपाई मिळणेबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमदारांच्या बैठकीमध्ये आ. आबिटकर यांनी पडखंबे प्रकल्पातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती. या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांना निर्देश दिले.

यानुसार मंत्री गडाख यांनी शेतकऱ्यांना जमिनींच्या नुकसान भरपाईपोटी ७ कोटी ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या पडखंबे तलावाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती आली मिळाली आहे. पडखंबेसह न्हाव्याचीवाडी, वपरेवाडी, शेळोली परिसरातील शेकडो एकर जमिनी ओलीताखाली येणास मदत होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे सहकार्य लाभल्याचे आ. आबिटकर यांनी सांगितले.