रांगोळी (प्रतिनिधी)  :  यळगुड येथे कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न झाले.  यावेळी पक्षाच्या झेंड्याचे पुजन  विनायक डंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहीद भगतसिंग, बळीराजा, कॉ. मलाबादे, भाई माधवराव बागल यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.

या अधिवेशनात शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, तीन कृषी कायदे रद्द करा, कामगार संहिता रद्द करणे, रेशन व्यवस्था बळकट करणे,  उसाला एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, महिला अत्याचार थांबले पाहिजेत, निराधार विधवा संजय गांधी पेन्शन महिना पाच हजार मिळाले पाहिजे असे विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

यावेळी पक्षाचे राज्य सचिव उदय नारकर यांनी केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या तसेच शेतकरी आंदोलन कामगार आंदोलन विविध कंपन्यांचे खाजगीकरण याचा आढावा घेत सरकारच्या विरोधात आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

यावेळी प्राचार्य एस.बी. पाटील, कॉ. आनंदराव चव्हाण, मुमताज हैदर आप्पा परीट, राजेंद्र शिंदे, चंद्रमा मगदूम, अनिता वड, आण्णासो कांबळे, दशरथ जाधव, कार्यकर्ते उपस्थित होते.