कोल्हापूर (प्रतिनिधी) : थकीत पाणी बिलप्रकरणी महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह थकीत पाणी बिल असलेल्या कार्यालयातील प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. थकबाकी भरावी, अन्यथा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. यामुळे सामान्य थकबाकीदाराप्रमाणे या कार्यालयांची बिले वसूल होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून थकीत पाणी बिल वसुलीची मोहीम व्यापकपणे राबवली जात आहे. शहर परिसरात असणाऱ्या शासकीय कार्यालयांतीलही पाणी बिल अनेक वर्षे थकीत आहे. कार्यालय प्रमुखांना नोटीस काढून थकबाकीची रक्कम भरण्यासाठी आवाहन केले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, सीपीआर, रेल्वे विभाग, पाटबंधारे वारणा, शिवाजी विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे पंचगंगा आणि टेलिफोन कार्यालयासह अन्य कार्यालयांचा समावेश आहे.

विभागनिहाय थकबाकीची रक्कम अशी :

ग्रामपंचायत – ६ कोटी ९४ लाख ६४ हजार ९२७, सीपीआर – ६ कोटी ६२ लाख ४७ हजार ८०१, रेल्वे विभाग – १ कोटी ६ लाख ७ हजार ४२, पाटबंधारे वारणा – ८६ लाख ८० हजार ३२०, शिवाजी विद्यापीठ – ६६ लाख ३८ हजार ६९६, सार्वजनिक बांधकाम विभाग, ५८ लाख ९३ हजार ९६, पाटबंधारे पंचगंगा – ५४ लाख ४१ हजार ८३२, जिल्हाधिकारी कार्यालय – २३ लाख ८० हजार २६६, जिल्हापरिषद -१६ लाख ८२ हजार ३६७, टेलिफोन कार्यालय – ८५ लाख ३ हजार ८५८.