बोरपाडळे (प्रतिनिधी) : असळजपासून तीन ते चार किमी. अंतरावर असणाऱ्या जंगलातील नष्ट झालेला जांभळीचा पाणवठा असळज वन विभागाने वन्य प्राण्यांसाठी श्रमदानातून पुन्हा जिवंत केला आहे. हा पाणवठा गेली कित्येक वर्षे बंदावस्थेत होता.

असळजपासून तीन ते चार किमी. अंतरावर घनदाट जंगलातील जांभळीचा पाणवठा गेले कित्येक वर्षे बंदावस्थेत होता. परिणामी जंगलातील प्राण्यांना बारा महिने पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. या पाण्याचा उगम असूनही तो पाणवठा मृतावास्थेत होता. जंगलातील प्राण्यांना आगामी उन्हाळ्यात याची झळ पोहचू नये म्हणून वनरक्षक आर.एम.मुल्ला, वनकर्मचारी आनंदा पाटील, पांडुरंग पाटील, तुकाराम पाटील, सर्जेराव पाटील यांनी त्या घनदाट जंगलात खोरे, टिकाव आणि अन्य साहित्य वापरून जांभळीचा पाणवठा पुन्हा उर्जीत केला.

वनरक्षक आर. एम. मुल्ला म्हणाल्या की, उन्हाळ्याच्या दिवसात वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. परिणामी हे प्राणी  पाणी पिण्यासाठी गावांजवळील नदीकाठी प्रवेश करतात. आता या पाणवठ्याला बारा महिने ऐन उन्हाळ्यातही पिण्यासाठी पाणी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे या प्राण्यांना आता बारा महिने पाणी मिळणार असल्याचे सांगितले.