कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात राज्य शासनाच्यावतीने आधारभूत किंमत धान खरेदी योजना हंगाम २०२०-२१ अंतर्गत पाच ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत, अशी माहिती दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिली.

चंदगड तालुका खरेदी-विक्री संघामार्फत तुर्केवाडी, चंदगड ता. कृषीमाल फलोत्पादन अडकूर, आजरा किसान सह. भात खरेदी विक्री संघ मर्या. आजरा, उदयगिरी शाहूवाडी ता. सह. संघमार्फत मलकापूर तसेच मार्केटींग फेडरेशनमार्फत गोकुळ- शिरगाव येथे धान खरेदी केंद्र सुरू केली आहेत. ही खरेदी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलव्दारे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्याकरिता प्रथम शेतकऱ्यांनी त्यांची मूळ डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा प्रत, तसेच या सातबाऱ्यावर चालू खरीप हंगाम २०२० मधील धान पीक लागवडीची नोंद असणे आवश्यक असून सोबत आधार कार्ड व बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्सची आवश्यकता आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार नोंद झालेल्या शेतकऱ्यांची खरेदी करण्यात येईल व खरेदी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर खरेदीची रक्कम वर्ग करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संस्थेच्या कार्यालयाशी अथवा शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर येथील जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.