कोल्हापूर (प्रतिनिधी) : गंगावेश ते शिवाजी पूल या आखरी रस्त्याच्या रखडलेल्या कामास अखेर मुहूर्त मिळाला. या कामाबाबत आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने वारंवार निवेदन देऊन केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. काम सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या कामाची अनौपचारिक सुरूवात ज्येष्ठ नागरिक भगवान बावडेकर यांच्या हस्ते करण्यात आली.

ड्रेनेज व पाईपलाईनचे काम आखरी रास्ता मित्र मंडळाच्या सदस्यांसमोर सुरू करण्यात आले. यावेळी कृती समितीच्या वतीने किशोर घाटगे यांनी कामाबद्दल व पाठपुराव्याला सहकार्य केल्याबद्दल आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांचे आभार मानले. काँक्रीट रस्त्याचा शासनाकडे जो प्रस्ताव आहे त्याला त्वरित मंजुरी घ्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.  या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने वारंवार निवेदन देऊन पाठपुरावा सुरू होता. तसेच काही दिवसापूर्वी या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता. याची दखल घेत प्रशासनाने कामाला सुरूवात केली आहे. यावेळी कृती समितीचे राकेश पाटील, प्रकाश गवंडी, सुरेश कदम, रियाज बागवान, दिनेश ओतारी, ठेकेदार सुरेश कोलेकर आदीसह नागरिक उपस्थित होते.