सेनापती कापशी (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे हे  हिंदवी स्वराज्याचे महान मराठा योध्दे होते. त्यांनी मोगलांची कधीच गय केली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी हिंदवी स्वराज्याशी इमान राखल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ते सेनापती कापशी येथे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाच्या कामाच्या पाहणीवेळी बोलत होते. यावेळी वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.

सेनापती कापशी येथील तलावात या स्मारकाचे काम सुरू आहे. यापूर्वी स्मारकासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाला होता. दरम्यान, भाजप सरकारच्या काळात निधीअभावी या स्मारकाचे काम रखडले. आता पुन्हा नव्याने सात कोटी रुपये निधी मंजूर झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

ना. मुश्रीफ म्हणाले की, या महिनाअखेरीस निविदा निघून पुढच्या महिन्यापासून काम सुरू होईल. वर्षभरातच या स्मारकाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या स्मारकाचा लोकार्पण सोहळा होईल. या महान मराठा योद्ध्यांचे स्मारक पूर्ण करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. हे स्मारक एक ऐतिहासिक ठेवा म्हणून पिढ्यानपिढ्या जनतेला प्रेरणादायी ठरणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील, जि.प. सदस्य मनोज फराकटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. माने, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, कागलचे उप अभियंता डी. व्ही. शिंदे आदी उपस्थित होते.