कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत राहिली. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून रूग्णांची संख्या घटते आहे. सहा महिन्यांत पहिल्यांदाच कोरोनाने मृत्यू होण्याला ब्रेक लागला आहे. पण अजूनही धोका टळलेला नाही. दिवाळी तोंडावर आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनापासून दूर राहण्यासाठी तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळणे अशा खबरदारीच्या उपाययोजना काटेकोरपणे पाळाव्यात, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.

सप्टेंबर महिन्यात कोरोनाने कहर केला होता. रोज आठशे ते हजारांपर्यंत रूग्ण आढळत होते. मृत्यूंची संख्याही दोन अंकीवर पोहचली होती. एकूण ४८ हजार २२३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ४५ हजार ६५८ जण बरे झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ९२२ जण कोरोनाबाधित आहेत. रोज बाधित होणाऱ्यांची संख्याही पन्नाशीच्या आतमध्ये आली आहे. बरे होणाऱ्यांची संख्या वाढल्याने मृत्यूचे प्रमाण घटते आहे. सहा महिन्यात पहिल्यांदाच मृत्यूचा आकडा शून्यावर आला आहे. अजूनही कोरोना प्रतिबंधात्मक लस आलेली नाही. म्हणून प्रत्येकाने खबरदारी घेतलीच पाहिजे, अन्यथा कोणत्याही क्षणी याचा संसर्ग होण्याचा धोका आहे. आजार बळावला तर मृत्यची संख्याही वाढू शकते, हे यापूर्वीच्या आकडेवारीवरून दिसते आहे. शहर, जिल्ह्यात एकूण तब्बल १६४३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. परिणामी कोरोनाचा धोका कायम आहे.