दिल्ली (वृत्तसंस्था) :  कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे आज निधन झाले. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने सर्वच प्रेक्षक वर्गाला धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांची प्रकृती बिघडली होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळगावी कानपूरमध्ये नव्हे तर दिल्लीतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.  

१० ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर कोसळले. यावेळी त्यांना तत्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. तसेच तेथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली होती. तब्बल ४२ दिवस ते कोमात होते. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. राजू नेहमी त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देत असे आणि ते फिटदेखील होते. ३१ जुलैपर्यंत ते सतत शो करत होते. शिवाय अनेक शहरांमध्ये त्यांचे शो होणार होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.

तब्बल २९ वर्षे कॉमेडी शो करणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचा जन्म २५  डिसेंबर १९६३ रोजी कानपूर येथे झाला. राजू यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी त्यांना सपाने तिकीट दिले होते, पण त्यांनी ते नाकारले होते. १९९३ मध्ये त्यांनी विनोदाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.