आ. आबिटकर यांच्या घरावर उद्या शिवसेनेचा मोर्चा

0
1603

गारगोटी (प्रतिनिधी) : राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गारगोटी येथील निवासस्थानावर उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता भगवा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिली.

आमदार प्रकाश आबिटकर यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्याच्या निषेधार्थ आणि पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भगव्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ते म्हणाले, गेली आठ वर्षे आमदार प्रकाश आबिटकर यांना पक्षाने मोठा निधी दिला होता. कृषी विभागाचे कॅबिनेट दर्जाचे मोठे पदही दिले होते.

पक्षाने एवढे काही देऊनसुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मंत्रीपदाच्या लालसेपोटी पक्षाशी गद्दारी करून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. त्यांच्या या भूमिकेविरूद्ध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरूण दुधवङकर जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव मार्गदर्शन करणार आहेत. या मोर्चाला विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी सकाळी ११  वाजता गारगोटी येथील हुतात्मा चौकात उपस्थित राहावे, असे आवाहन विजय देवणे यांनी केले आहे.