आजरा (प्रतिनिधी) : राज्यातील सत्ता संघर्षाबाबत जबरदस्त चुप्पी असताना शनिवारी आजरा, भुदरगड व राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या आजरा संपर्क कार्यालयावर असलेल्या पोस्टरला तालुका शिवसेनेच्या वतीने काळे फासण्यात आले आणि जोरदार घोषणाबाजीही झाली. तालुकाप्रमुख युवराज पोवार यांच्या नेतृत्वाखाली काही शिवसैनिकांनी ही कृती केली. शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर आमदार आबिटकर यांच्या संदिग्ध भूमिकेने हा स्फोट घडल्याचे येथील आंदोलक शिवसैनिक सांगत आहेत. याबाबत अद्यापही आमदार आबिटकर किंवा अन्य कोणी याची स्पष्टोक्ती केलेली नसल्याने आजरा तालुक्यात याबाबत एकूणच संभ्रम वाढला आहे.
बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या तंबूत आमदार आबिटकर पहिल्या दिवसापासून डेरेदाखल झाले खरे, पण त्याबाबत त्यांच्याकडून कोणताही होकार किंवा नकार येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मिळालेला नाही. विविध वाहिन्यांवरून आमदारांची जी काही छबी दिसते, ती अस्वस्थ अशी आहे. ते मनापासून तेथे गेलेले नाहीत, असे दिसत असताना दस्तुरखुद्द आमदारांनी याबद्दल येथील शिवसैनिकांसाठी कोणतेही सूचक वक्तव्य किंवा मेसेज केलेले नाहीत.
स्थानिक वृत्त वाहिनीवरून प्रसारित झालेल्या आसामच्या गुवाहाटीस्थित हॉटेलमधील आमदारांच्या वादावादीबद्दल आमदार आबिटकर यांनी एक बाईट दिली आहे; पण एकूण भूमिका सांगितली नाही. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम व प्रचंड अस्वस्थता आहे. येथील तालुकाप्रमुख पोवार यांच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या पोस्टरला काळे फासण्याची कार्यवाही झाली. त्यानंतरही संबंधितांकडून कोणतीच प्रतिक्रिया मिळालेली नाही. आमदार जोपर्यत याबाबत स्पष्टीकरण स्वतः देत नाहीत तोपर्यंत याबाबत स्पष्टपणे सांगता येत नसल्याची सावधानता बरेच जण बाळगत आहेत.
दरम्यान, बंडाच्या पहिल्याच दिवशी आमदार आबिटकर सुरतला गेल्यानंतर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्याने त्यांचे बंधू जि.प. चे माजी सदस्य अर्जुन आबिटकर यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी स्वतः मुंबईत असून, याबाबतची माहिती नंतर देऊ, असे स्पष्टपणे सांगितले होते; मात्र त्यानंतर कोणतीही माहिती मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही बाजूंचा सर्वोच्च न्यायालयात सामना सुरू असल्याने सर्वांचेच ‘वेट अँड वॉच’ची नीती अवलंबली जात आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ११ जुलैला होत असल्याने, याबाबतची संदिग्धता अधिकच वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.