कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथील सागर लक्ष्मण पाटील (वय ३२) या तरूणावरती मुंबई येथे मोफत (टोटल हिप रिप्लेसमेंट) ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी सुमारे ९ लाख ५० हजार रुपये खर्च झाला. आ. डॉ.विनय कोरे यांच्या प्रयत्नातून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

सागरची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची वडील वारल्यानंतर आई व अपंग बहीणीची संपूर्ण जबाबदारी सागर वरतीच होती. दुग्ध व्यवसाय व बाहेर मोलमजूरी करुन तो कसाबसा घर चालवत होता. एकदा अवजड काम करत असताना तो पडला होता. एका वर्षानंतर अचानकपणे त्याच्या पायामध्ये चमक मारू लागल्यामुळे त्याला चालता येत नव्हते. त्यामुळे तीन वर्ष या व्याधीने त्याला जडले. हालचाल होत नसल्याने काम करता येत नव्हते. खाजगी डॉक्टरांना दाखवले त्यांनी शस्त्रक्रियेचा सल्ला देऊन ही बाब खर्चीक असल्याचे सांगितले होते. परंतु परिस्थिती बेताची असल्यामुळे सर्व थांबले होते. गावातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रा.प.सदस्य,  संभाजी कापडे यांनी संजय बंगे (आळवे) यांच्या सहकार्याने आ. डॉ. विनय कोरेंची वारणानगर येथील निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन सागरची परिस्थितीची व्यथा मांडली.

त्यानंतर पन्हाळा-शाहूवाडी मतदार संघाचे आ. डॉ. विनय कोरे यांनी मुंबई येथील एल.एच.हिरानंदानी हॉस्पीटलशी फोनवरती संपर्क साधून तेथील डॉक्टरांशी चर्चा करून तातडीने शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. शासनाच्या चॅरीटीनुसार १०% गोरगरिब रूग्णांवरती मुंबई येथील एल.एच.हिरानंदानी हॉस्पीटलमध्ये मोफत उपचार केले जातात. आ. डॉ. विनय कोरे यांच्या शिफारशीनुसार ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. एका होतकरू तरुण व गरीब रुग्णाला जीवनदान दिल्याने कोरे यांचे धामणी खोऱ्यातून कौतुक होत आहे. तसेच आ. कोरे यांचे आभार मांडताना सागर पाटील म्हणाले की माझ्या सारख्या अनेक रूग्णांना साहेबांनी जीवनदान दिले आहे व एका गरीब रुग्णाची दखल घेऊन तातडीने शस्त्रक्रिया केली व मला एक नवीन जीवनदान दिले.