कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणुकीसाठी आता राधानगरीचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांनी येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना सांगितले.

त्यांचे बंधू अर्जुन आबिटकर यांनी पालकमंत्री सतेज पाटील आणि खासदार संजय मंडलिक यांच्याशी आमचे घनिष्ठ संबंध आहेत, पण आमचे स्थानिक विरोधक  त्यांच्याबरोबर असल्याने कार्यकर्त्यांचा आमच्यावर दबाव आहे. त्यामुळे सध्या आम्ही कोणताच निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्ट केले आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघात आबिटकरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार के.पी.पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय.पाटील, अरूण डोंगळे हे आहेत. त्यामुळे काही जरी झाले तरी भविष्यातील राजकारण लक्षात घेता कार्यकर्त्यांनी विरोधी शाहू आघाडीबरोबर जाण्यास विरोध दर्शवला आहे. शाहूवाडी-पन्हाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजीत पाटील (सरूडकर) यांनी सत्ताधारी आघाडीसोबत जाण्याचा शुक्रवारी निर्णय याच कारणामुळे घेतला आहे. तेच कारण आता आबिटकर गटाला लागू पडत आहे.

लवकरच होणाऱ्या बैठकीत आ. आबिटकर कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतात की सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जातात. याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. आ. आबिटकर यांनी लोकसभा निवडणुकीत तसेच गोकुळ सत्ताधाऱ्यांविरोधात मल्टीस्टेट मुद्द्यावरून रान उठविले होते. त्यामुळे त्यांचा निर्णय काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.