मुंबई (प्रतिनिधी) :  राज्यातील महाविद्यालयांमध्ये दीड वर्षांनंतर आज (बुधवार) पासून विद्यार्थ्यांची लगभग दिसणार आहे. मात्र कोरोना लसीच्या अटीमुळे उपस्थितीवर मर्यादा असणार आहेत. तर राज्यातील हॉटेल्स आता मध्यरात्री १२ पर्यंत सुरू राहणार आहेत. राज्य शासनाने तसे आदेश जारी केले आहेत. इतर दुकाने रात्री ११ पर्यंत खुली ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कोविड-19च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असून आता रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री ११ पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोविडसाठी लागू असलेली मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन नागरिकांना आणि आस्थापनांना करावे लागणार आहे. पूर्णपणे लसीकरण, गर्दीच्या क्षमतेवर निर्बंध, हे परिस्थिती नुसार लागू राहील.

जवळपास दीड वर्षांनंतर आज राज्यातली कॉलेजेस सुरू होत आहेत. कॅम्पस, कॉलेजेस आज विद्यार्थ्यांनी गजबजणार असून वर्गात ५० टक्के उपस्थितीचे बंधनकारक केले आहे. कृषी महाविद्यालयंही आजपासून सुरू होणार आहेत. लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सर्व महाविद्यालयांनी वर्गांचं निर्जंतुकीकरण केले. सोशल डिस्टन्सिंग पाळता यावे म्हणून तशी आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे.