मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच, सर्व विद्यापीठांच्या ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (बुधवार) दिली.  

सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमधील परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी कोरोनाबाधित असतील, तर त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे. खासगी विद्यापीठांनी देखील या निर्णयाचे पालन करावे.

तसेच सर्व विद्यापीठं, महाविद्यालयांतील वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन आणि निश्चित कालावधी देऊन वसतीगृह देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, परदेशातून आपल्या राज्यात आलेल्या  विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची सुविधा बंद करण्यात येऊ नये,  अशा सूचना मंत्री सामंत यांनी दिल्या आहेत.