कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हयात आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बाधित झालेल्या व होऊ शकतील अशा सर्व रुग्णांना एकत्रित विलगीकरण सुविधेमध्ये उपचार देणे अत्यावश्यक आहे. कोरोना आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी पूर्ण वेळ विलगीकरण रुग्णालय असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर), इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी (आयजीएम), उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज ही ३ रुग्णालये व यासाठी कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवेसहीत आजपासून (गुरुवार) १० दिवसांनी पुढील आदेशापर्यत या रुग्णांवरील उपचारासाठी पूर्ण वेळ विलगीकरण रुग्णालय म्हणून कार्यान्वित करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

 तीनही रुग्णालयातील इतर आजाराच्या रुग्णांना टप्प्याटप्प्याने इतर खासगी रुग्णालये, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालय धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या धर्मादाय रुग्णालयाकडे संदर्भीत करून वरील नमूद रुग्णालये पूर्ण वेळ विलगीकरण रुग्णालय म्हणून पुढील १० दिवसात कार्यरत करणेत यावीत. या रुग्णालयात पुढील आदेश होईपर्यत कोरोना विषाणू संशयित रुग्ण तपासणी व औषधौपचार वगळता इतर सर्व आजाराचे बाहय रुग्ण उपचार सेवा आणि इतर आजाराच्या आंतररुग्णांना द्यावयाच्या वैद्यकीय सुविधा बंद राहतील, असे आदेशात म्हटले आहे.