कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि जिल्हा परिषदेचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी शासनामार्फत देण्यात येणारी को-व्हॅक्सिन लस आज (सोमवार) घेतली. या वेळी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आमच्या केंद्रात येऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली, ही आमच्या केंद्रासाठी प्रेरणादायी बाब असल्याच्या भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.

जिल्हाधिकारी देसाई आणि संजय सिंह चव्हाण आज शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आले. त्यांनी प्रथम या प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपलब्ध तसेच आतापर्यंत किती लोकांना लस दिली याची माहिती घेतली. त्यानंतर आरोग्यसेविकेकडून लस टोचून घेतली. जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावरील चालक विनोद भापकर यांनीही लस घेतली. पहिल्या टप्यातील आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी लस घेतली. त्यानंतर आता इतर विभागातील अधिकाऱ्यांनाही लस दिली जात आहे.

या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. फारुख देसाई, प्रभारी आरोग्य अधिकारी स्वप्निल शिखरे, हातकणंगले बीडीओ  शबाना मोकाशी,  तालुका आरोग्य अधिकारी सुहास कोरे, यांचेसह आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.