कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेतर्फे राबवण्यात येत असलेल्या आजच्या ७९ व्या स्वच्छता मोहिमेत शहरातील प्रमुख चौक, उद्याने आणि रस्त्यांवर स्वच्छता करण्यात आली. शाहू उद्यान, सानेगुरुजी वसाहत तसेच सर्किट हाऊस परिसरातील ३ टन कचरा संकलित करण्यात आले.

आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या (रविवार) स्वच्छता मोहिमेतून शहरातील प्रमुख चौक आणि रस्ते, गटारी, नाले, फुटपाथ, घाट तसेच उद्यानामधील कचरा, प्लास्टिक, झाडे, झुडपे काढून परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यात आला. शहरात माझी वसुंधरा अभियानांतर्गत दुर्मिळ तसेच औषधी वृक्ष लागवड करण्यात आली. आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते शाहू उद्यान, सर्किट हाऊस, सम्राट नगर, परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण करण्यात आले. छत्रपती शाहू उद्यान परिसरात आयुक्त डॉ. बलकवडे यांनी हातात झाडू घेऊन प्रत्यक्षपणे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. शेंडा पार्क ते एस एस सी बोर्ड, हॉकी स्टेडीयम ते गोखले कॉलेज, धैर्य प्रसाद हॉल ते सर्किट हाऊस, सी पी आर हॉस्पीटल, ते खानविलकर पेट्रोल पंप, कावळा नाका ते शिरोली जकात नाका, पदमाराजे उद्यान, रंकाळा तलाव परिसर, के एस बी चौक ते मिल्ट्री कॅम्प तसेच हॉकी स्टेडीयम, डी एस पी चौक ते रमनमळा चौक रोडवरील कचरा व प्लास्टिक गोळा करण्याबरोबरच झाडे, झुडपे आणि कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला.