शहरात स्वच्छता मोहिमेत २ टन कचरा गोळा

0
57

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेतर्फे राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत रस्ते, चौक, उद्याने स्वच्छ करण्याबरोबरच दुर्मिळ तसेच औषधी वृक्ष लागवड, जुन्या झाडांना आधारासाठी काठया व शेडनेट बांधण्यात आले. नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेऊन आगळया-वेगळया पध्दतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ८० व्या स्वच्छता मोहिमेतून शहरातील प्रमुख चौक आणि रस्ते, गटारी, नाले, फुटपाथ, घाट तसेच उद्यानामधील कचरा, प्लास्टिक, झाडे, झुडपे काढून परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यात आला. शहरात दुर्मिळ तसेच औषधी वृक्ष लागवड करण्यात आली. स्वच्छतेबरोबरच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देऊन नागरिकांना वृक्षारोपाणाचे महत्व सांगण्यात आले. यावेळी स्वरा फौंडेशनमार्फत छत्रपती शाहू उद्यान परिसरात ४० झाडे लावण्यात आली.

नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य्‍ देऊन कोल्हापूर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्य संपन्न्‍ बनविण्यासाठी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही सहायक आयुक्त संदिप घारगे यांनी यावेळी केले. यावेळी स्वच्छता दूत अमित देशपांडे, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छता मोहिमेत गांधी मैदान, हॉकी स्टेडीयम ते गोखले कॉलेज, महावीर कॉलेज ते भगवा चौक, पंचगंगा नदी घाट परिसर, कावळा नाका ते शिरोली जकात नाका, शेंडा पार्क ते एस एस सी बोर्ड तसेच जयंती नदी मैला, सांडपाणी पंपिंग स्टेशन, सर्किट हाऊस ते लाईन बाजार मेनरोड, भक्तीपूजानगर चौक परिसर, रुईकर कॉलनी मैदान, रेणुका मंदिर ते हॉकी स्टेडियम चौक रोडवरील कचरा व प्लास्टिक गोळा करण्याबरोबरच खुरटी झाडे, झुडपे आणि कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. मोहिमेत सुमारे २ टन कचरा, प्लॅास्टिक गोळा करण्यात आले. दोन पाण्याचे टँकर, दोन टँकर, १ औषध फवारणी टँकर, ३ आरसीगार्ड, ४ जेसीबी, ९ डंपरचा वापर करण्यात आला. महापालिकेचे ११० स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.