मुंबई (प्रतिनिधी) : हिवाळा सुरू झाल्यापासून राज्यभर गुलाबी थंडीची चाहूल सर्वांना जाणवू लागली आहे. आता थंडीचा तडाखा येणाऱ्या काही दिवसांत वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश शहरांमध्ये किमान तापमान आणखी कमी होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

आताही राज्यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान खाली उतरले आहे तर विदर्भामध्येही तापमानाचा पारा स्थिर असल्याचं पाहायला मिळते. पुढील काही दिवसांमध्ये पहाटेच्या किमान तापमानामध्ये विशेष फरक जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात विशेषतः खान्देशात थंडी वाढणार असून, दुपारीही उन्हाच्या चटक्यासह हलकी थंडीही जाणवणार आहे.

उत्तर भारताकडून राज्याकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा थंडी सुरू झाली आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मराठवाडा, विदर्भामध्ये कडाक्याची थंडी वाजेल, असा हवामान खात्याचा इशारा आहे. मुंबई हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये २१ नोव्हेंबरपर्यंत वातावरण कोरडे असणार आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे.