कोल्हापूर (प्रतिनिधी) : कॉम्रेड शहीद गोविंद पानसरे यांच्या शहीद दिनानिमित्त (२० फेब्रुवारी) सरकारला जाग आणण्यासाठी व मारेकरी आणि सूत्रधार यांच्यावर कारवाई होण्यासाठी महाराष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यातून मूक मोर्चा काढण्याचे ठरवण्यात आले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन अमरावती येथे उत्साहात पार पडले. या तीन दिवसीय राज्य अधिवेशनात कोल्हापूर जिल्ह्यातून ७ महिलांसह ३७ प्रतिनिधीनींनी व राज्यभरातील सर्व जिल्ह्यातून ४२३ प्रतिनिधींनी सहभाग घेतला. अधिवेशनाची सुरुवात राज्य सेक्रेटरी कॉ. तुकाराम भस्मे यांच्या अध्यक्षतेखालील महारॅलीने व राष्ट्रीय सचिव अमरजित कौर व डॉ. भालचंद्र कांगो यांच्या संबोधनाने झाली.

नेमानी हॉल चौक येथून निघालेल्या रॅलीमध्ये दिलेल्या विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अखेरच्या प्रतिनिधी सत्रामध्ये ८७ राज्य कौन्सिल मेंबरची निवड करण्यात आली. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कॉ. सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, गिरीश फोंडे, सम्राट मोरे व शुभांगी पाटील या पाच जणांचा समावेश आहे. तसेच राज्य सेक्रेटरीपदी अॅड. कॉम्रेड सुभाष लांडे व कंट्रोल कमिशनरपदी कॉ. दिलीप पवार यांची निवड करण्यात आली.

स्मिता पानसरे, डॉ. राम बाहेती, प्रा. तानाजी ठोंबरे, कॉम्रेड मिलिंद गणवीर व क्रांती देशमुख यांनी अध्यक्षीय मंडळाचे काम पाहिले. प्रतिनिधी सत्रामध्ये तुकाराम भस्मे यांनी राजकीय अहवाल, तर अॅड. सुभाष लांडे यांनी संघटनात्मक अहवाल मांडला. या अहवालांवर सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधींनी परिपूर्ण अहवाल सादर केला. तो एकमताने मंजूर करण्यात आला.

भाकपचे राष्ट्रीय महाअधिवेशन १४ ते १८ ऑक्टोबर विजयवाडा येथे होणार आहे. त्या अधिवेशनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कॉ. सतीशचंद्र कांबळे व दिनकर सूर्यवंशी यांच्यासह २१ प्रतिनिधींची निवड करण्यात आली. या अधिवेशनात महत्त्वपूर्ण निरनिराळे ठराव पारित करण्यात आले. शाहीर सदाशिव निकम, नामदेव पाटील, हनुमंत लोहार, विक्रम कदम, दिलदार मुजावर, महेश लोहार शोभना कांबळे, स्नेहल कांबळे, आरती रेडेकर, मारुती नलवडे, आक्काताई पाटील, भारती चव्हाण, रेखा कांबळे,  उत्कर्ष पवार, मुस्ताक शेख आदी कार्यकर्त्यांनी अधिवेशन कामकाजात सहभाग घेतला.