मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने लॉकडाऊन जाहीर केला नसता तर कोरोना रुग्णांची संख्या ९ ते १० लाखांवर गेली असती. नाइलाजाने कडक निर्बंध लागू करणे राज्य सरकारला भाग पडले. राज्यातील जनता संयमाने हे निर्बंध पाळत आहे. आणखी कडक निर्बंध लागणार नाहीत. स्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी जनतेला आणखी काही दिवस निर्बंध पाळावे लागतील, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण करणार. लसीचा साठा मिळेल त्याप्रमाणे लसीकरण करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. आज (शुक्रवार) रात्री त्यांनी जनतेला संबोधित केले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की  राज्यातील आरोग्य सुविधा मागील वर्षापेक्षा मोठ्या प्रमाणावर सुधारली आहे. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ही मोठी असल्याने रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. सध्या राज्याला दररोज ५०, ००० रेमडिसीवर इंजेक्शनची गरज आहे. मात्र, गरज नसेल रेमडिसीवर इंजेक्शनचा वापर करू नका. सर्वच राज्यांना पुरवठा करावा लागत असल्याने केंद्र सरकारकडून इंजेक्शन, ऑक्सिजनचा मर्यादित पुरवठा होत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केल्यानंतर त्यांनी हा पुरवठा वाढविण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारने हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे ठरवले आहे. त्याचप्रमाणे जम्बो कोविड सेंटर्सचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील दोन महिने शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. त्या दृष्टीने सरकार तयारी करीत आहे.