मुंबई (प्रतिनिधी) : राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वीकएंड लॉकडाऊनची घोषणा केली. शुक्रवार रात्रीपासून त्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे. जनतेने त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीत राज्यात कडक लॉकडाऊनबाबतचा निर्णय दोन दिवसांत घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. किमान पंधरा दिवस कडक लॉकडाऊन लावावा लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाची दुसरी लाट भयंकर आहे.  राज्यातील विविध शहरांतील हॉस्पिटल, कोविड सेन्टर्स रुग्णांनी भरून गेली आहेत. पुणे, नागपूर या शहरात तर एकही व्हेंटीलेटर बेड शिल्लक नसल्याची चिंताजनक परिस्थिती आहे.. मात्र, ही तात्पुरती उपाययोजना असल्याचे सरकारमधील अनेक मंत्र्यांचे मत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. यामध्ये सरकारमधील तीनही पक्षांचे महत्त्वाचे मंत्री – अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसेचे संस्थापक राज ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे यासह वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

कठोर निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. अन्यथा १५ एप्रिलनंतर भीषण परिस्थिती होऊ शकते, एक रुग्ण २५ जणांना बाधित करतो, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच आपणास नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे स्पष्ट केले. मुख्य सचिव कुंटे यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले.

देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला सर्व ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली, मात्र सर्वसामान्यांचे हाल होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सुचवले. सर्वांचे म्हणणे ऐकून अखेर मुख्यमंत्री ठाकरे यांनी कडक लॉकडाऊनबाबत दोन दिवसांत अंदाज घेऊन निर्णय घेणार असल्याची घोषणा केली. किमान पंधरा दिवसांचा लॉकडाऊन लावण्याची गरज आहे, मात्र सर्वांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.