कोल्हापूर (प्रतिनिधी) : एकमेकांना विश्वासात घेऊन एकसंधपणे काम करा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुकीत यश मिळवून शिवसेना बळकट करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांना दिल्या. कामे घेऊन या, कोणतीही कामे अडवली जाणार नाहीत अशी ग्वाही देत शिवसैनिकांना उभारी देण्यासाठी लवकरच जिल्ह्याचा दौरा करण्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. 

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी कोल्हापुरातील शिवसेनेचे नेते खा. धैर्यशील माने, खा. संजय मंडलिक,  आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर,  आ. प्रकाश आबिटकर,  जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचेसह माजी आमदार राजेश क्षीरसागर, डॉ. सुजीत मिणचेकर,  उल्हासदादा पाटील, सत्यजित पाटील, चंद्रदीप नरके यांनी भेट घेतली. या वेळी कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील अपयशाबद्दल मनाला लावून घेऊ नका. एकमेकांच्या संपर्कात राहा, सर्वांना विश्वासात घ्या आणि एकसंघपणे काम करा. जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका नेटाने लढवून यश मिळवा आणि शिवसेना जिल्ह्यात बळकट करा, अशा सूचना दिल्या. मुख्यमंत्री सडक योजनांसह आवश्यक ती कामे घेऊन या. कोणतेही कामे अडवली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

चर्चेतून कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका आणि आगामी काळात नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत खा. संजय मंडलिक आणि आ. राजेश क्षीरसागर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी हुपरी आणि रेंदाळ येथील प्राथमिक आरोग्य येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत निवेदन दिले. कोरोनाच्या काळातील निधी मिळण्याबाबत चर्चा झाली. उल्हास पाटील यांनी रुग्णवाहिकेचे साठी निधीची मागणी केली.

खा. धैर्यशील माने यांनी पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रदूषणास कारणीभूत असलेले साखर कारखाने, इतर उद्योग आणि इतर घटक यांची संयुक्त बैठक घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा करू असे सांगितले.