मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाची लाट पुन्हा येत आहे. अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार आणि योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत. मात्र काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करत आहेत. त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन समज द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी २४ हजार रुग्ण दररोज सापडायचे. तिथे आता ४७०० ते ५००० रुग्ण दररोज आढळत आहेत. रुग्णसंख्या कमी होत असली, तरी आम्ही राज्यातील जनतेला गाफील न राहण्याच्या आणि त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगावे व राजकारण न करता उपाययोजनांत सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात. आज एकीकडे आम्ही कोरोनाला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क घालणे हे आवाहन करीत असून दुसरीकडे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करत आहेत, त्यामुळे आमचे सर्व प्रयत्न असफल होऊ शकतात व करोना लाटेला आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे अशा पक्षांना समज द्यावी.