…तोवर सीमाभाग केंद्रशासित करा… : मुख्यमंत्री

0
144

मुंबई (प्रतिनिधी) : कर्नाटक सीमावादाचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत आहे. पण जोपर्यंत न्यायालयात प्रक्रिया सुरू आहे तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित का केला जात नाही? ताबडतोब हा भूभाग केंद्रशासित करा’ अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे  केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज (बुधवार) ‘महाराष्ट्र -कर्नाटक ‘सीमावाद- संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सरकारवर टीका केली.

‘महाराष्ट्र एकीकरण समितीत दुही का निर्माण झाली ? ही ताकद मराठीची ताकत होती. सीमाप्रश्न हे सरकार सोडवणार आहे. आम्ही कधीही कानडी भाषेचा विरोध करत नाही, पण कानडी अत्याचाराचा विरोध करतच राहणार. सीमावाद न्यायालयीन प्रक्रियेत आहे आणि तरीही बेळगावात विधानसभा सौध बांधलं जातं आणि अधिवेशन घेतलं जातं, मग हा न्यायालयाचा अवमान नाही का? जोपर्यंत न्यायालयात प्रक्रिया सुरू आहे तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित का केला जात नाही ? ताबडतोब हा भूभाग केंद्रशासित करा’ अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

या कार्यक्रमाला सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थिती होते. यावेळी सीमा भागाचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.