मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. सरकार व्यापारी, व्यावसायिकांविरोधात नाही. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. व्यापाऱ्यांनीही कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभिर्याने विचार करून उपाय योजना केल्या जातील, दोन दिवसांत यावर सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. आज (बुधवार) त्यांनी राज्यातील विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आताची कोरोनाची लाट प्रचंड मोठी आहे. कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती. आता रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. मागील वर्षी मार्चमध्ये बेडसची संख्या सात आठ हजार होती. ही संख्या आता पण पावणेचार लाखांपर्यंत वाढविली आहे. जंम्बो कोविड सेंटर्स काढली. कोणत्याही राज्याने केली नसेल अशा सुविधा निर्माण केल्या. पण या सुविधाही अपुऱ्या पडण्याची वेळ येईल, अशी स्थिती येण्याची शक्यता आहे. नव्या लाटेत आता तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात बाधित होऊ लागला आहे. लक्षणे नसलेल्यांची संख्या सत्तर टक्क्यांहून अधिक वाढली आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक बाधित होण्याची शक्यता आहे.

तुमच्या सूचनांचा स्वीकार केला, तर कामगार- कर्मचाऱ्यांना तुमच्या कुटुंबातील समजून त्यांच्या आरोग्याची जबाबदारी तुम्ही घ्या. रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका. हा लढा सरकारशी नाही. विषाणूशी लढा आहे. तुम्ही महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहात. तुमचे नुकसान होऊ देणार नाही. कोरोनावर मात करायची आहे, हे लक्षात घ्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या वेळी चर्चेमध्ये विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी वीरेन शहा, बी. सी. भरतीया, जितेंद्र शहा, विनेश मेहता, ललित गांधी, मोहन गुरनानी यांनी म्हणणे मांडले. विषाणूची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या हातात-हात घालून काम करू. आताच्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात यावी. व्यापाऱ्यांचे काम चालू राहील आणि विषाणू संक्रमण रोखण्यासाठीचे नियमही काटेकोर पालन होईल, अशी उपाय योजना करावी.

या चर्चेत आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी आदी सहभागी झाले होते.