कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाचे ओपल हॉटेलमधील खाते आत्ता या क्षणापासूनच बंद करा, अशी सूचना नूतन संचालक नवीद मुश्रीफ यांनी कार्यकारी संचालकाना केली. तसेच, संचालकांसाठी आणले जाणारे हारतुरे, पुष्पगुच्छ, आणि पाण्याच्या बाटल्यानाही तात्काळ पायबंद घाला, असेही त्यांनी बजावले. ते गोकुळच्या दूध संघाच्या नूतन संचालकांचा कार्यालय प्रवेशावेळी बोलत होते. यावेळी गोकुळ दूध संघाचे संस्थापक कै. आनंदराव पाटील -चुयेकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

यावेळी ना. हसन मुश्रीफ आणि ना. सतेज पाटील यांनी याआधीच जाहीर केल्याप्रमाणे दूध उत्पादकांना लिटरला दोन रुपये दरवाढ देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच दूध संघामार्फत ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची घोषणा या दोन्ही नेत्यांनी केली आहे. त्याबाबतही नियोजनाबाबक चर्चा झाली. दूध संघाच्या कामावर गैरहजर राहून पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना गंभीर व निर्वाणीचा इशारा या बैठकीत देण्यात आला आहे. तसेच कामगारांना ऊद्यापासून कामावर हजर राहा. अन्यथा, पुढच्या महिन्यापासून पगार मिळणार नसल्याचा इशाराही देण्यात आला.

यावेळी नूतन संचालक नवीद मुश्रीफ यांनी, आम्ही गोकुळ दूध संघाचे संचालक झालो आहोत, मालक नव्हे. दूध उत्पादक शेतकरीच या संघाचे मालक आहेत. दूध उत्पादकांनी आपल्या पोरा बाळांच्या तोंडचे काढून दूध संघाला घातले आहे. त्या पैशावर संचालक म्हणून आम्ही चैनी करत बसणं, हे आमच्या नीतीमत्तेत बसत नाही. या दूध संघात विश्वस्तांच्या भूमिकेतूनच काम करू, मालक म्हणून नव्हे. असे स्पष्ट केले.

या बैठकीला नूतन सत्ताधारी संचालक मंडळातील विश्वास पाटील, अरुण डोंगळे,  नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, शशिकांत पाटील- चुयेकर, रणजीतसिंह पाटील, अजित नरके,  सुजित मिणचेकर, प्रा. किसन चौगुले, बाबासाहेब पाटील, एस. आर. पाटील (चिखलीकर), अभिजीत तायशेटे, श्रीमती अंजनाताई रेडेकर, बयाजीराव शेळके, प्रकाश पाटील आदी नूतन संचालक उपस्थित होते. मात्र, चौघे विरोधी नूतन संचालक या बैठकीला अनुपस्थित राहिले.