चंदगड (प्रतिनिधी) : एका सामाजिक कार्यकर्त्याला न केलेल्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी चंदगड पंचायत समितीमधील एक वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यावर खोटा जबाब देण्यासाठी दबाव टाकत असल्याचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यामुळे चंदगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मागील काही महिन्यापूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्याने ग्रामपंचायतमधील सदस्यांनी खोटे जबाब दिल्याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून पंचायत समितीच्या दारात सुमारे दीड महिने आंदोलन केले होते. पंचायत समितीची बदनामी झाली, असे म्हणत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आंदोलन करून पंचायत समितीचे एक दिवसाचे काम बंद ठेवले. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

आता याच सामाजिक कार्यकर्त्याचे आणि एका कर्मचाऱ्याचे संभाषण व्हायरल झाले आहे. यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी यांच्यावर जबाब देण्यासाठी दबाव टाकत असल्याचे कर्मचारी सांगत आहे. या कर्मचाऱ्याने असा खोटा जबाब देणार नाही असे स्पष्टपणे सांगत प्रामाणिकपणा दाखविल्याचेही दिसून येते. यामुळे या सामाजिक कार्यकर्त्यावरील गुन्हा खरा की खोटा याबद्दल चंदगड तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.