सरोळी (प्रतिनिधी) : सरोळीच्या मातीचे ढेकूळ इतके कठीण आहे की अत्यंत कष्टाने ते फोडावे लागते. फुललेल्या मातीला इथली माणसे एव्हढा जिव्हाळा लावतात की त्यातून सुसंस्काराची बीजे पेरली जातात व नवनिर्मितीची शिखरे काबीज केली जातात. याचे संक्रमण पिढ्यानपिढ्या चालू आहे. या मातीचा माणुसकीचा ओलावा चिरकाल आजही टिकून असल्याची प्रचिती एका दृष्टीहीन मित्राला केलेल्या मदतीतून आली.

सरोळीतील अंध बाळासो सुतार यांची परिस्थिती बेताची. अनेक अडचणींना तोंड देत ते सांसारिक जीवन जगत आहेत. ही गोष्ट लक्षात येताच १९८५ – ८६ मध्ये  सातवीला असणारे त्यांचे वर्गमित्र एकत्र येऊन अंध बाळासो यास फराळ व १० हजार रुपयांची मदत करून त्याच्या जीवनात प्रकाश पोहोचविण्याचा प्रयत्न केला. वर्गमित्रांच्या या मदतीनंतर भारावलेल्या बाळासो यांने सर्व वर्गमित्रांचे आभार मानले.

अत्यंत हुशार व तरबेज असणारा बाळासो सुतार नियतीच्या कचाट्यात सापडला. पावकी, दिडकी हे पाढे तोंडपाठ व खेळातही विशेष प्राविण्य पण अंध झाल्याने त्याचे जीवन अंधकारमय बनले. त्यांच्या जीवनात आनंद खुलविण्यासाठी जयसिंग केसरकर, रविंद्र पाटील व जनार्दन पाटील या वर्गमित्रांनी तातडीने आर्थिक निधी जमा करून बाळासो याच्याकडे सुपूर्द केला. कोणत्याही मोठ्या पदावर नसलेल्या या वर्गमित्रांनी एका अंध मित्राला केलेली  मदत परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे. त्यांची मदत करण्याची भावना नक्कीच प्रेरणादायी आहे.