कोल्हापूर (प्रतिनिधी) : दोन मद्यधुंद पोलिसांनी शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला. याप्रकरणी उपाधीक्षक यांचे अंगरक्षक प्रविण प्रल्हाद पाटील यांनी फिर्याद दिली. त्यानुसार तिघाजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात आज (रविवार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

महामार्ग पोलीस कर्मचारी बळवंत शामराव पाटील (वय ५१, रा. पोलीस मुख्यालय कोल्हापूर), राजकुमार शंकर साळुंखे (वय ५३, रा. बेडेकर प्लाझा, कसबा बावडा), जितेंद्र अशोक देसाई (वय ३६, रा. कासारवाडी, ता. हातकणंगले) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत.

अधिक माहिती अशी की, कसबा बावडा येथील १०० फुटी रस्ता परिसरात शनिवारी मध्यरात्री पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण दोन पोलिसांसह गस्त घालत होते. यावेळी उघड्यावर महामार्ग पोलीस बळवंत पाटील, राजकुमार साळुंखे, जितेंद्र देसाई  दारू पिऊन दंगामस्ती करत होते. त्यांना पोलीस उपाधीक्षक चव्हाण आणि त्यांचा अंगरक्षक प्रवीण पाटील यांनी हटकले. मात्र, ते त्यांच्यावरच धावून गेले. आणि त्यानंतर त्यांनी धक्काबुक्की करत चव्हाण आणि पाटील यांना शिवीगाळही केली. हा प्रकार चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना सांगितला. त्यांनी या तिघांवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.