कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा भारतीय हवामान वेधशाळेने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार सावधानतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे दि.२१ आणि २२ जुलै रोजी अतिमुसळधार पावसाची तर दि. २३ व २४ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.

राजेश क्षीरसागर म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील चंदगड, आजरा, राधानगरी, शाहुवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भुदरगड तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नदी आणि नाल्यांच्या पात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. शहरातील पूरबाधित क्षेत्रासह जिल्ह्यातील नदी काठावरील गावांतील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. संभाव्य पूरस्थितीची जाणीव झाल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

या काळात जिल्ह्यातील नागरिकांनी संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, मोबाईलचा वापर टाळावा. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे, घर किंवा इमारत कोसळणे, पूर येणे, दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता असते. अशावेळी नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच  प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे,  असे आवाहन राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.