मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने सुरू झालेले महाराष्ट्रातील सत्तानाट्य बुधवारी रात्री संपुष्टात आले. विधानपरिषदेच्या निवडणूक निकालानंतर शिंदे यांनी रात्रीतूनच बंडखोर आमदारांसह महाराष्ट्र सोडला. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशाने नऊ दिवस शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्षाचे राजकीय नाट्य पाहिले. महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचे केंद्र सूरत ते गोवा व्हाया गुवाहाटी असे सरकत गेले आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याने थांबले. या संपूर्ण सत्तानाट्याचा घटनाक्रम…

२० जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे २५ आमदारांसह गुजरातमध्ये दाखल

२० जून : उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली.
२० जून : एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या पक्ष प्रतोद पदावरून हकालपट्टी.
२० जून : आणखी आमदार गमावू नयेत या भीतीने शिवसेनेने आपल्या उर्वरित आमदारांना मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले.
२० जून: एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी तोडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची विनंती केली.
२१ जून : एकनाथ शिंदे यांनी आपल्याला ३५ हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला.

२२ जून : शिंदे ४० आमदारांसह आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले.
२२  जून : मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.
२२  जून : संजय राऊत यांनी भाजपवर शिवसेनेत बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
२३  जून : एकनाथ शिंदे आणि ३७  आमदारांनी शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी घोषणा केली.

२४ जून : शिवसेनेने बंडखोर आमदारांविरोधात याचिका दाखल करून महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे शिंदे कॅम्पच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली.
२४ जून : भाजपला पाठिंबा देणाऱ्या दोन अपक्ष आमदारांनी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला. ३४ आमदारांच्या स्वाक्षरी असलेला अविश्वास ठराव झिरवाळ यांनी फेटाळला. कारण ही याचिका निनावी ई-मेलद्वारे पाठवण्यात आली होती.
२४ जून : एकनाथ शिंदे यांनी गुजरातमधील वडोदरा येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गृहमंत्री अमित शहा हेही तेथे असल्याचे सांगण्यात आले.

२६ जून : उपाध्यक्षविरोधातील अविश्वास ठराव फेटाळल्याप्रकरणी शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
२७ जून: सुप्रीम कोर्टाने ११ जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवली आणि उपाध्यक्ष झिरवाळ यांना त्यांच्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाबाबत तपशीलवार प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.
२८ जून : मंत्रिपदावरून भाजप आणि शिंदे यांच्यात बैठक. नवीन सरकारमध्ये २८ कॅबिनेट मंत्री असतील, ज्यामध्ये १८ कॅबिनेट मंत्री आणि १० राज्यमंत्र्यांचा समावेश असेल. शिंदे गटाकडे १२ मंत्री असतील.

२९ जून : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेऊन फ्लोअर टेस्टची मागणी केली.
२९ जून : बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने ३० जून रोजी फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश दिले.
२९ जून : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही वेळातच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करून रात्री राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.
२९  जून : बंडखोर आमदार गुवाहाटी सोडून गोव्यात दाखल.