कोल्हापूर (प्रतिनिधी) : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आर्थिक फसवणूक व अन्य सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने चित्ररथ व पथनाट्याचे अनावरण आज (शुक्रवारी) पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

चित्ररथ व पथनाट्याचे अनावरण व अपर अधीक्षक तिरूपती काकडे, पोलीस उप अधीक्षक मुख्यालय प्रिया पाटील, सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, सायबर पोलीस ठाण्याच्या कोमल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर अधीक्षक तिरूपती काकडे यांच्या पर्यवेक्षणाखाली कोल्हापूर शहर व जिल्हा परिसरात सध्याच्या संगणकीय युगात वाढीस लागलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे होणारी सर्व सामान्यांची आर्थिक फसवणूक व अन्य सायबर गुन्हे कसे घडतात व त्यास कसा प्रतिबंध करावा याची जनजागृती व्हावी म्हणून पोलीस उप अधीक्षक मुख्यालय प्रिया पाटील, ‘सायबर’चे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, ‘सायबर’च्या कोमल पवार व त्यांच्या पथकास जनजागृती चित्ररथ व पथनाट्य सादरीकरणाची जबाबदारी सोपवली होती.

वाहनांबाबत सोशल मीडिया तसेच ऑनलाईन व्यवहार करताना होणाऱ्या चुका, त्यातून होणारी फसवणूक, बदनामी कशी होते, त्यास कसा आळा घालावा, कशी कायदेशीर कारवाई करावी, याबाबत सर्व सामान्य जनतेला आत्मसात होईल अशा पध्दतीने चित्ररथ कोमल पवार व अंमलदार अजय सावंत यांनी तयार करून घेतला आहे.

डी. के. शिंदे स्कूल ऑफ सोशल वर्कचे एचओडी डॉ. दीपक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वतीने पथनाट्य बसविण्यात आले. या पथनाट्यामध्ये सोशल मीडियाद्वारे येणारे फेक कॉल, आर्थिक आमिषे, बदनामीची धमकी/ भीती, नोकरीचे, महिलांना लग्नाचे, मोठ्या रकमेची लॉटरी लागल्याचे, वेगवेगळी बिले प्रलंबित दंडाची भीती घालून ती ऑनलाईन भरायला लावणे, आर्मी अधिकारी यांचे ओळखपत्र दाखवून वाहन खरेदी करण्यास भाग पडणे, अशी विविध प्रकारची आमिषे दाखवून आर्थिक फसवणूक करणे इ. बाबींना कसे बळी पडू नये यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती देण्यात येणार आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ‘सायबर’चे पोलीस अंमलदार अजय सावंत, अनिल बरगे, सुधीर पाटील, सचिन बेंडखळे, महादेव गुरव, सागर माळवे, अमर वासुदेव, रवींद्र पाटील, दिलीप पोवार, विनायक बाबर, प्रदीप पावरा, रवींद्र गाडेकर, संगीता खोत, पूनम पाटील, रेणुका जाधव, छायाचित्रकार अर्जुन चंद्रे, सर्जेराव पोवार यांनी परिश्रम घेतले.